Sunday, December 15, 2013

बहिष्कृत भारत हेच नाव का दिलं

या ब्लॉगबद्दल ..

या ब्लॉगला हेच नाव का दिलं ?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे नाव पत्राला दिलं होतं. आज इतक्या वर्षांनी पुन्हा तेच नाव का वापरावंसं वाटलं ? तशी नावं सुचली होती. एकतृतियांश भारत, वन थर्ड इंडीया, अस्वस्थ भारत, अनुल्लेखित भारत वगैरे वगैरे. नाव देतानाच मनात विचार येत होते ते भारताच्या ३०% लोकसंख्येचं कुणालाच काही पडलेलं नाही. ३० % लोकसंख्या ही भारत देशाच्या तथाकथित मुख्य प्रवाहाच्या खिजगणतीतही नाही. ना मेडीयाला कदर आहे, ना सरकार, विरोधी पक्षाला वेळ आहे. या ३०% ची आठवण फक्त ५ वर्षातून एकदाच होते. त्या वेळी गाजरं दाखवली जातात आणि नंतर व्यवस्थित विस्मरण होतं. जणू काही हे ३०% लोक अस्तित्वातच नाहीत.

पण अधून मधून त्यांची आठवण येते. या समाजाबद्दल जेव्हां नकारात्मक बातम्या देण्याची संधी येते तेव्हां. त्यामागचं सत्य, असत्य शोधून काढणं अनेकदा जिकिरीचं बनतं. या सत्यशोधनासाठी हा ब्लॉग आहे. अशा घटनांचं विश्लेषण करणे, त्यातून शिकणे, एकत्र येणे आणि शक्य होईल तितक्या रचनात्मक कार्याची उभारणी करणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर आहे. खूप मोठे दावे करण्यात अर्थ नाही. आपल्या स्वत:च्या मर्यादा असतात. समाजाची अवस्थाही खूप आशादायी आहे असं नाही. पण अडचणीतून मात करत एकत्र येण्याची गरज आहे. पक्ष, गट - तट, संस्था, संघटना या भेदापलिकडे जाऊन ३०% चं एकत्र येणं ही काळाची गरज होऊन बसली आहे. एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकमेकांशी बोलण्याची गरज आहे. या विचारांवर विश्वास असणा-या सर्वांसाटी हे व्यासपीठ उपलब्ध आहे.

No comments: